Press "Enter" to skip to content

वंचित बहुजन आघाडीचे वादळ आता मुंबईच्या दिशेने ! कल्याणमधील सभेला तुफान गर्दी ! ऍड. प्रकाश आंबेडकर, बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे भाजपा सरकारवर टिकास्त्र !

कल्याण , कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे वादळ आता मुंबईच्या दिशेने सरकले आहे.भारिपचे अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या साथीने महाराष्ट्रात सुरु झालेले वादळाने रविवारी २७ जानेवारी रोजी कल्याण येथे धडक दिली. कल्याण येथे आयोजित केलेल्या सत्ता परिवर्तन सभेला तुफान गर्दी होती. ऍड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणमधील सभा झाली.

सवर्णांना दहा १० टक्के आरक्षण दिले त्याच वेळी सरकारची वैचारिक दिवाळखोरी समोर आली. त्यांच्याकडे देण्यासारखे काही नाही. विकासाचा आराखडा नाही. सरकारची परिस्थिती कारकूनासारखी झाली आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आता अशा वैचारिक दिवाळखोरांचे सरकार उचलून फेकून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कल्याण येथे रविवारी सत्ता संपादन मेळाव्यात केले.

आंबेडकरांनी आरोप केला की, शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे जमिनी हडप करण्याच्या मागे लागले आहेत. मुंबई,ठाणे,कल्याणच्या आसपास ७० किलोमीटरपर्यंतचा जो भाग आहे तो सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.  या पक्षांचे नेते शोषण करतात, जमिनी हडप करतात आणि आम्ही विकास करतो, असे सांगतात. ते सत्तेच्या बळावर जमिनी हडप करतात. त्यांना महाराष्ट्रात इतर शहरे विकासाठी नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्तेत बसलेले अब्जोपती बनले. यांना सत्ता गब्बर होण्यासाठी सत्ता हवी, असा आरोपही त्यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीत उमेदवारी ही घराणेशाहीतल्या लोकांना मिऴणार नाही. लोकशाहीची सत्ता आणायची आहे. लोकशाही सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे, असेही त्यांनी सांगितले. आरएसएसचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा मनुवाद आहे. त्यांच्याकडे एके-४७ सापडते. मुस्लिमांबद्दल ते खोटा प्रचार करतात. आरएसएसवाल्यांनो तुम्ही शस्त्र कोठून आणतात ते तरी सांगा, असे खोचक आवाहन आंबेडकर यांनी केले. सत्ता परिवर्तनासाठी सर्व वंचितांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात सरकारने दुजाभाव केला आहे. आतापर्यंत किती दलित, मुस्लिम आणि आदिवासींना भारतरत्न देण्यात आला असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचे आता वय झाले आहेत. दलित बांधवांनो ते तुमच्यासाठी जिवंत आहेत, त्यांच्या पाठीमागे उभे राहा. अशी भावनिक सादही ओवेसींनी घातली. कल्याण येथे सत्तासंपादन मेळाव्यात ते बोलत होते.

तीन तलाक विधेयक संसदेत मांडण्यात आले, त्यावेळी मी विरोध केला. तुमच्या या भावाने विरोध केला. इतर कुणीही विरोध केला नाही. जर प्रकाश आंबेडकर संसदेत असते तर, संपूर्ण संसद हलून गेली असती, असे ओवेसी म्हणाले.

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता ओवेसींनी जोरदार टीका केली. ओवेसी म्हणाले, आठवले फक्त कविता करतात. त्यांना दलित बांधवांसाठी संसदेत पाठविले. परंतु ते तुमच्यासाठी काहीच करत नाहीत, असा आरोपही ओवेसींनी केला. मुस्लिम महिलांच्या तलाकवर बोलणा-यांनो गुजरातच्या बहिणीबाबत कुणीही बोलत नाही. आमच्या बहिणीलाही दिल्लीला बोलवा. काँग्रेसची मंडळीही याबाबत काही विचारत नाहीत. कारण सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात. कारण सगळे लिमिटेड कंपनी आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा हे एकच आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

भारिपचे रत्न बनसोडे, एमआयएमचे ठाणे जिल्हा सचिव आय्यद मौलवी, भारिपचे नेते ऍड हणमंत वाक्षे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मनोज शर्मा ,माजी अध्यक्ष अरुण गायकवाड, भारिप जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश निकम तसेच असंख्य पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »