बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेलमध्ये !
पनवेल, प्रतिनिधी : महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. ०९ ऑक्टोबर ) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे प्णवळ तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
अविनाश कोळी यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरु आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरु आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघात बुधवारी त्यांचा दौरा होणार असून त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाची माहिती, ध्येय धोरणे बुथ मधील शेवटच्या नागरिकापर्यंत माहिती व्हावी, याकरिता एका प्रमुख पदाधिकाऱ्याकडे विधानसभा मतदार संघातील तीन ते चार बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असून पक्षाने त्यांना 'विधानसभा वॉरियर्स' म्हणून संबोधले आहे. अशा मावळ लोकसभा मतदार संघातील विधानसभा वॉरियर्सची बैठक स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी ९. ३० वाजता घेणार आहेत. तत्पूर्वी ते पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
निवडणुकीत मतदान होईपर्यंत तो बुथ अधिकाधिक मजबूत करण्यासाठी म्हणजेच त्या बुथवर ५१ टक्के चे गणित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात या बैठकीत श्री.बावनकुळे ‘विधानसभा वॉरियर्स’ सूचना देणार आहेत. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतले, लोकहिताच्या विविध योजना अंमलात आणल्या त्याची माहिती देण्यासाठी ‘घर घर चलो संपर्क अभियान’ सुरु आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील पनवेल, उरण, कर्जत या तीनही विधानसभा मतदार संघातील हि बैठक झाल्यानंतर पनवेल शहरात ‘घर घर चलो’ अभियान व ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या घर घर चलो संपर्क अभियानात प्रदेशाध्यक्षांसोबत तीनही विधानसभेतील हजारो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते पनवेल मधील काही परिवाराच्या भेटी घेणार असून त्यानंतर होणाऱ्या कॉर्नर बैठकीत ते कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या संघटनात्मक दौऱ्याची पनवेलमध्ये तयारी जल्लोषात सुरु असल्याचेही अविनाश कोळी यांनी सांगितले.
कोट-
भाजप इतरांपेक्षा वेगळा आणि जबाबदारीने काम करणारा पक्ष आहे. सतत कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये राहणारा पक्ष आहे. एनडीए जिंकले पाहिजे यासाठी आमचा प्रवास आहे. भाजपचे संघटन ताकदीने सर्व २८८ विधानसभा मतदार संघात उभे आहे. – आमदार प्रशांत ठाकूर
Be First to Comment