रायगड जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था !
पडकी इमारत, ना लाईट, ना पाणी !
खारघर – फरशीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात !
अन्यथा, तीव्र आंदोलन करू : युवानेते रमजान शेख यांचा इशारा !
पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खारघर – फरशीपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शाळेची इमारत अत्यंत जुनाट आणि पडक्या स्थितीत आहे. पडकी इमारत, ना लाईट, ना पाणी अशा भयंकर परिस्थिती विद्यार्थी शिकत आहेत.
मागील १३ वर्षांपासून येथील विद्यार्थी येथे मरणयातना सोसून शिक्षण घेत आहेत. येथे कोणत्याही क्षणाला शाळेची इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषद प्रशासन झोपलंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय-हक्कांसाठी होप मिरर फाउंडेशन संस्था धावून आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष रमजान शेख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळा आणि तेथील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेट दिली.
सदर शाळेमध्ये २० मुली व २० मुले शिकतात. चौथी वर्गापर्यंत शाळा आहे. मात्र, १३ वर्षांपासून शाळेची अवस्था बिकट आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व मनावर होत आहे.
दरम्यान सदर प्रकरणी रमजान शेख यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोल करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, पनवेल मनपा आयुक्त, पनवेल गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे रमझान शेख म्हणाले. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचे रमजान शेख यांनी पत्रकारांना सांगितले,
कोकण दर्पण.
Be First to Comment