पनवेल : खारघर कॉलनी फोरमचे नेते मधु पाटील यांच्या खारघर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. कॉलनी फोरमच्या अध्यक्षा तथा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना अर्जुन गरड यांच्या शुभहस्ते सदर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी कॉलनी फोरमच्या समन्वयक अनिताताई भोसले आणि फोरमचे नेते ऍड बालेश भोजणे उस्थितीत होते.
आगामी काळात होणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉलनी फोरमने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जनसंपर्क कार्यालये सुरु करण्याचा धडाका लावला आहे. त्या अनुषंगाने खारघर येथे आणखी एका जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. खारघर सेक्टर २१ येथे सुरु केलेले कॉलनी फोरमचे नेते मधु पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. याद्वारे नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे मधु पाटील यांनी यावेळी नमूद केले. कॉलनी फोरम हे स्वतंत्र व्यासपीठ असून पनवेल महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार उभे करून जिंकून आणू, असा विश्वास यावेळी लीना गरड यांनी व्यक्त केला. कॉलनी फोरमच्या समन्वयक अनिताताई भोसले यांनी आपले मनोगत व्याकर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर होनमाने यांनी केले. यावेळी खारघरमधील शेकडो नागरिक उपस्थित होते.