Press "Enter" to skip to content

चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट; केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन- सावळे रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण ! आमदार महेश बालदी यांचे विशेष प्रयत्न !

पनवेल : उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन- सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन शनिवार दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ०५ वाजता होणार आहे.
सोमाटणे पेट्रोलपंप या ठिकाणी हा सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उरण विधानसभा मतदार संघात येणारा कोन-सावळे रस्ता अत्यंत खराब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाकडून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना निदर्शनास आले. त्यामुळे आमदार झाल्यांनतर महेश बालदी यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. राज्य सरकार याकडे लक्ष देणार नाही, हे त्यांना माहित होते त्यामुळे त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचा विकास केंद्रीय रस्ते विकास निधीतून होणार आहे. त्यामुळे भाजप केंद्र सरकार व आमदार महेश बालदी यांनी चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट दिली आहे.