पनवेल : कामोठे शहराला वीज पुरवठा करणारी विद्युत वाहिनी कमी क्षमतेची असल्याने अतिभाराने अनेकदा कामोठे शहरातील वीज खंडित होते. कामोठे शहरात वारंवार सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे येथील नागरिक त्रस्त असून तातडीने कामोठे येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहराच्या वतीने वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे कामोठे शहर कार्याध्यक्ष किशोर मुंढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कळंबोली सहाय्यक अभियंत्यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष आजिनाथ सावंत, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, पदवीधर संघ कार्याध्यक्ष समिध फदाले, राष्ट्रवादी काँग्रेस कामोठे महिला शहराध्यक्षा संगीता पवार, महिला उपाध्यक्षा संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.
कामोठे शहराची लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आले. शहराची विजेची गरज दिवसांगणिक वाढत आहे. सुमारे ८० हजार वीज ग्राहक कामोठे शहरात असताना फक्त एकच विद्युत उपकेंद्र आहे. त्यामुळे ओव्हरलोडमुळे अनेकदा वीज खंडित होते. कोविडनंतर अनेकजण ऑनलाईन काम करतात, मुलांच्या शाळा अद्यापि ऑनलाईन सुरु आहेत, त्यामुळे वीज खंडित झाली कि मोठी गैरसोय होते. त्यामुळे कामोठे येथे आणखी नवीन उपकेंद्र बसवून विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्यात, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने कार्याध्यक्ष किशोर मुंढे यांनी केली.
खारघर शहरामध्ये सुमारे ६० हजार ग्राहकांस १० उपकेंद्र आहेत. तर कामोठे शहरामध्ये ८० हजार ग्राहक असून देखील एकच उपकेंद्र आहे हा अन्याय कामोठे वासियांवर का असा सवाल देखील महावितरण विभागाला राष्ट्रवादीने केला. दरम्यान, लवकरात लवकर सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी महावितरण विभागाकडून देण्यात आहे.