Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा गुळसुंदेतील पाणीसमस्येवर तारांकित प्रश्न !

पनवेल : पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. गुळसुंदे परिसरातील ही महत्त्वाच्या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
आपल्या प्रश्नामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी नमूद केले आहे की, गुळसुंदे (ता. पनवेल, जि. रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी या आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे ऑक्टोबर 2021मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्षे जुन्या नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास या गावांना पाणीपुरवठा होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही खरे आहे काय? असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून उपरोक्त गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे सवाल आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले.
यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे तसेच गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्षे जुन्या नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास या गावांना पाणीपुरवठा होत असल्याचे अंशतः खरे आहे. दररोज टीसीएल व अ‍ॅलमची प्रक्रिया करून जलशुध्दीकरण केंद्रातून गुळसुंदे हद्दीतील गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.