पनवेल : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुपोषित मुलांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून सरकारला सवाल केला आहे.
आपल्या प्रश्नामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विचारणा केली आहे की, कर्जत (जि. रायगड) तालुक्यात कुपोषित मुलांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शून्य ते सहा वयोगटातील संख्या अधिक असल्याचे ऑक्टोबर 2021 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे. या आदिवासीबहुल तालुक्यात अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधवांचे वास्तव्य असून परिस्थितीमुळे कुटुंबातील लहान मुलांना योग्य पोषण आहार देऊ शकत नसल्याने तसेच बालकांच्या उपचारासाठी एनआरसी सुरू नसल्याने कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपनाच्या अतिरिक्त संचालकांनी आदेश देऊनही आठ महिने उलटले तरी उपजिल्हा रुग्णालयात एनआरसी केंद्र सुरू नसल्यामुळे उपचाराअभावी कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कुपोषित बालकांच्या संख्येचे प्रमाण कमी करण्याबाबत तसेच एनआरसी केंद्र सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?
यावर राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात कुपोषित मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याची व ही संख्या शून्य ते सहा वयोगटात अधिक असल्याची बाब अंशत: खरी आहे. ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) बालके उपचारापासून वंचित राहू नये याकरिता आरोग्य विभागाच्या समन्वयाने 15 ते 31 ऑगस्ट 2021दरम्यान सॅम बालकांसाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. या शोधमोहिमेत कर्जत तालुक्यामध्ये ऑगस्ट 2021मध्ये 92 सॅम बालके होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021मध्ये 53 बालके सॅम श्रेणीमध्ये होती. त्यापैकी 16 बालकांच्या श्रेणीमध्ये सुधारणा झालेली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्यात येत आहे तसेच सॅम बालकांसाठी एनसीआर केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आवश्यकतेनुसार सॅम बालकांना एनसीआर केंद्रामध्ये दाखल करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सप्टेंबर 2021पासून कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे एनसीआर केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून त्यामध्ये सप्टेंबरमध्ये चार सॅम बालके आणि ऑक्टोबरमध्ये दोन सॅम बालके दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी चार बालकांच्या श्रेणीमध्ये सुधारणा झाली आहे.
कर्जतमधील कुपोषित मुलांचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मांडला अधिवेशनात !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »