Press "Enter" to skip to content

सिडकोने तातडीने सेवा व सुविधांचे हस्तांतरण पनवेल महापिालकेला करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार !

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सामाविष्ट झालेल्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोने तातडीने पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देतानाच महापालिकेच्या विकासाकामाकरिता आवश्यक ती मदत देण्याचे, आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (९डिसेंबर) झालेल्या बैठकीत दिले.पनवेल महापालिका आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी महापालिका क्षेत्रात होत असलेल्या विविध विकास कामांचे सादरीकरण आजच्या बैठकित केले.

महापालिकेच्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या बैठकीस पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबई पोलिसआयुक्त बिपीन सिंह, आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, महापालिकेचे सर्व अधिकारी, अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. सिडको अधिकारी उपस्थित होते.

15 फेब्रुवारीपर्यंत सिडकोने सेवा व सुविधा पालिकेला हस्तांतरीत कराव्यात. यासाठी पालिकेला सहकार्य करावे अशा सूचना श्री. पवार यांनी सिडको अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

शहराचा विकास आराखडा तयार करताना वृक्षारोपणावर भर द्यावा.तसेच भविष्याचा विचार करून मंडई, बगिचे, पोलिस स्टेशन,दफन भूमी, स्मशानभूमी यासाठी विकास योजनेत जागा ठेवा. आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने करा, महापालिकेच्या प्रस्तावित इमारती बांधताना सौर उर्जेचा वापर, नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून उर्जेची बचत करा. भविष्याचा विचार करून अधिक पाणी साठवणूकीकरीता देहरंग धरणाचा विविध पातळीवर विचार करावा, त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना कराव्यात अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

पनवेल महापालिका ही मुंबई, पुणे, रायगड, विमानतळ अशा महत्वाची ठिकाणांना जोडणारी मध्यवर्ती महापालिका आहे. भविष्यात या महापालिकेला अधिक महत्व येणार असल्याने विकास कामे करताना शासनाच्या विविध विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन यावेळी श्री. पवार यांनी दिले. तसेच यावेळी नैना क्षेत्रांतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.