पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा सुमारे 783 कोटींचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या सदस्यांनी मंजूरी दिली. सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये स्थायी समितीची विशेष सभा घेण्यात आली होती.
सुमारे 783 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. 1 ऑक्टोबर 2016 ला स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने 2020-2021 मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहे तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचविण्यात आली नाही. स्थायी समितीने मंजूर केलेला हा अर्थसंकल्प पुढील येणाऱ्या महासभेपुढे मांडण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणारी उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहे. तसेच महिला –बालकल्याण विभागाच्या विविध योजना, मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानूसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेची प्रशासकिय इमारत,स्वराज्य, या मुख्यालयाचा विकास, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात 28 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पनवेल महापालिकेला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव अरविंद म्हात्रे यांनी मांडला. याचबरोबर नतून स्थायी समिती सदस्यांचे स्वागत सभापतींनी केले. स्थायी समिती सदस्य उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त गणेश शेटे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावाडे, लेखाधिकारी डॉ.संग्राम व्होरकाटे, लेखापरिक्षक विनयकुमार पाटील, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.