Press "Enter" to skip to content

मायबाप सरकार, आम्हाला न्याय द्या ! भयभीत कांबळे कुटुंबाची न्यायासाठी गृहमंत्र्यांकडे धाव ! नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार !

टाटा हॉस्पिटलच्या सुरक्षा अधिकार्‍यकडून
कर्मचार्‍याला जीवे ठार मारण्याची धमकी !

पनवेल : खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असलेले दिलीप नाखवा यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार टाटा हॉस्पिटलचे कर्मचारी सत्यनारायण कांबळे यांनी खारघर पोलिस ठाण्यात केली आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे. मायबाप सरकार, आम्हाला न्याय द्या, अशी विनवनी श्री कांबळे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला केली आहे. दरम्यान, न्यायासाठी सत्यनारायण कांबळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे धाव घेतली असून नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली आहे.

सत्यनारायण कांबळे हे खारघर सेक्टर २१ येथील साईदीप सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहतात. श्री कांबळे हे खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. मात्र, मागासवर्गीय असल्याने टाटा हॉस्पिटलचे उपमुख्य सुरक्षा अधिकारी राजन चव्हाण यांच्याकडून मला वारंवार जातीवाचक हिणवले जात होते, मी ड्रायव्हर असून मला लादी पुसण्यासाठी जाणीवपूर्वक राजन चव्हाण सांगत असल्याचे श्री कांबळे यांचे म्हणणे आहे. मी टाटा हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे, मात्र मला न्याय मिळाला नाही, उलट राजन चव्हाण यांनी मला कामावरून बडतर्फ केल्याचे कांबळे यांनी सांगितले. राजन चव्हाण यांच्या अन्यायाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे देखील कांबळे यांनी यावेळी नमूद केले.
माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मागील दीड वर्षांपासून मी लढत आहे. राजन चव्हाण यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मी खारघर पोलीस ठाणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना श्री चव्हाण यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले. १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिलीप नाखवा नावाच्या सुरक्षा अधिकाऱ्याने घरी येऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार श्री कांबळे यांनी खारघर पोलिसांकडे केली आहे. राजन चव्हाण याच्याविरोधातील तक्रार मागे घे, नाहीतर वाईट परिणाम होतील, अशी धमकी नाखवा याने दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ राजेंद्र बडवे हे राजन चव्हाण याला पाठीशी घालीत असल्याने या दोघांच्या सांगण्यानुसार नाखवा याने माझ्या घरी येऊन धमकवल्याचे श्री कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, सत्यनारायन कांबळे यांचे कुटुंब या प्रकारामुळे भयभीत झाले आहे. खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील अद्यापि गुन्हा दाखल झाला नसल्याने सत्यनारायन कांबळे यांनी आता राज्यातील महाविकस आघाडी सरकारकडे धाव घेतली आहे. सदर प्रकरणी श्री कांबळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, नवी मुंबई पोलीस उपायुक्त, नवी मुंबई सहाय्यक आयुक्त, खारघर पोलीस यांच्याकडे केली आहे

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »