नवी मुंबई : पांडवकडा परिसरात धोकादायक स्थिती असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव आहे. त्यात कोरोनामुळे बंदी आहे. ती झुगारून काहीजण रविवारी (१८ जुलै) या ठिकाणी पावसात भिजण्यासाठी गेले होते. मात्र जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने संबंधित पर्यटक या ठिकाणी अडकले. ही माहिती मिळताच सिडको अग्निशमन दल आणि खारघर पोलिसांनी संबंधित पर्यटकांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यांनी केलेल्या प्रयत्नाच्या पराकाष्टेमुळे या सर्व पर्यटकांचे जीव वाचले.
खारघरजवळील पांडवकडा हा नैसर्गिक धबधबा खास आकर्षण आहे. याठिकाणी पनवेल सह नवी मुंबई ठाणे आणि मुंबईतून अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी पूर्वी येत असत, परंतु येथे धोकादायक परिस्थिती असल्याने अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गेल्या काही वर्षापासून पांडव कड्यावर जाण्यास मनाई आहे. पोलीस सिडको आणि वनविभागाकडून मज्जाव केला जातो. परंतु तरीसुद्धा चोरट्या मार्गाने अनेकजण या ठिकाणी पावसात भिजण्यासाठी तसेच धबधबा पाहण्याकरिता बेकायदेशीररित्या जातात.
खारघर पोलीस ठाण्याच्यावतीने पांडवकडा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या आशयाचे फलक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा रविवारी काही पर्यटक गोल्फ कोर्स मैदानाच्या बाजूने पांडवकडा परिसरात गेले होते. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी डोंगरावरून खाली वाहु लागले. त्यामुळे संबंधित पर्यटकांना बाहेर येण्यासाठी जागाच राहिली नाही. पाणी वाढत असल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जीव मुठीत धरून या ठिकाणाहून सुटका करण्याच्या अनुषंगाने ते धावा करु लागले.
या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांबरोबरच अग्निशमन दल त्याठिकाणी हजर झाले. १३६ पर्यटकांमध्ये ७८ महिला ५ मुले हे पलिकडे अडकले होते. फायर ब्रिगेडच्या जवानांच्या सहाय्याने सर्वांना सुखरुप बाहेर काढले. अडकलेल्या सर्वांनी अग्निशमन दल व नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले. तरी नागरिकांनी स्वताच जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.
दरम्यान, यापुढे कोणत्या भागात फिरताना बेकायदेशीररित्या आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माळी यांनी दिला आहे.





