नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कामगार भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची गंभीर दाखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठेकेदाराला दणका दिला आहे. पैसे घेऊन कामगारांना भरती केल्याचा ठपका ठेवत नेरुळ नेरुळ येथील मे जय भवानी कँष्ट्रक्शन कंपनीला नोटिसा बजावल्या आहेत. सदर कंपनीने तात्काळ खुलासा करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
नवी मुंबई महापालिकापालिकेतील कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अनेक तरुणांकडून नोकरीसाठी दीड ते तीन लाख रुपये उकळले गेले असून यामध्ये तथाकथित लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे काही पदाधिकारी म्होरके असल्याचा ठपका ठवण्यता आला आहे. दरम्यान, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी तक्रार करून सदर कामगार भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती . महापालिका आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतल्याने मधले दलाल आणि म्होरक्यांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध आस्थापनांवर अनेक कामगार काम करतात. महापालिकेच्या विविध आस्थापनांवर कंत्राटी पद्धतीवर अनेक वर्षांपासून हजारो कामगार काम करतात. कंत्राटी कामगारांची पिळवणूक हा विषय सातत्याने प्रकाश झोतात असताना नव्याने झालेल्या कंत्राटी कामगार भरतीतील भ्रष्टाचाराने पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. पालिका प्रशासन ठेकेदारनमार्फत कंत्राटी कामगारांची भरती करते. कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक हा विषय गंभीर आहे. असे असताना नवीन भरतीत भ्रष्टाचार झाल्याने नवी मुंबई मनपा प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.
महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, उद्यान, घनकचरा व्यवस्थापन, वाहन अशा विविध विभागात मनुष्यबळ पुरवठा केला जातो.कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ पुरविणारे ठराविक कंत्राटदार असल्याने लोकप्रतिनिधी व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे कंत्राटदारामार्फत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून दीड ते तीन लाख रुपयांची मागणी करून अनेक तरुणांना नोकरीला लावल्याचीमाहिती उघड झाल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले होते.





