नवी मुबंई : मराठी माध्यमाची शाळा बंद पाडण्याचा वाशी येथील आयसीएल शाळेने घाट घातला असताना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या अशा संथ भूमिकेमुळे पालिकांनी पालिका सीबीडी येथील महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. पालक संघटनेच्या आक्रमकतेनंतर खडाडून जागे झालेल्या पालिकेच्या शिक्षण विभागाने आयसीएल शाळेविरोधात कारवाईची गती वाढविली.
वाशी सेक्टर १५-१६ येथील आयसीएल हायस्कूल शाळा व्यवस्थापन कमिटी ने “कोरोना प्रादुर्भावामुळे” मराठी माध्यमाच्या सर्व वर्गांचे नवीन प्रवेश बंद कले. या बाबतीत वारंवार शाळेच्या व्यवस्थापिका श्रीमती राव यांच्याशी पालकांनी चर्चा केल्या. आरटीई कायद्यान्वये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असतांनाही शाळेने शासनाचे आदेश पायदळी तुडवत फक्त आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतुनेच इंग्रजी माध्यमाचे प्रवेश मात्र चालु ठेवले होते .यावर सर्व पालकांनी शाळेच्या गेटवर २ जुलै रोजी आंदोलन केले. तरीही शाळेने दखल घेतली नाही.त्यामुळे पालकांनी लोक अधिकार सेवा समितीच्या माध्यमातून नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांची भेट घेऊन समस्या मांडली. शिक्षणाधिकारी यांनी तातडीने खुलासा करण्याचे लेखी आदेश दिले. तेव्हा शाळेने परस्पर शिष्टमंडळाला ,पालक प्रतिनिधींना काहीही न कळवता फक्त २० विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ला प्रवेश दिले. अजुन ४८ विद्यार्थ्यांना इयत्ता १ली ते ९ वी पर्यंत प्रवेश मिळालेले नसुन शाळेने काहीच कार्यवाही न केल्याने अखेर पालकांच्या आयसीएल शाळा पालक संघटनेने लोक अधिकार सेवा समितीचे अध्यक्ष बाळक्रुष्ण खोपडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश मिळावेत म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयावर धरणे आंदोलन केले.
यावेळी शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांनी तातडीने सदरच्या आयसीएल शाळेला पत्र पाठवुन पालकांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या यादीतील ६२ विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत आणि उर्वरीत विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश देऊन त्या संबधीत लेखी खुलासा पालकांच्या शिष्टमंडळाला आणि नवी मुंबई पालीकेला लवकरात लवकर देण्यात यावा, असे आदेश देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. शिष्टमंडळात नरेंद्र वैराळ अनिल घाणेकर, गोविंद जोशी, दिलिप गजभरे, राजेश वाडकर, सचिन पाटील, राम सोमवारे ,सौ.अंकिता नवाळे,आदिती मांडवकर,सुजाता तावडे,निर्जला मांगले,विनिता आळीम,श्रेया काप यांचा सहभाग होता.





