Press "Enter" to skip to content

बेकायदा बांधकाम परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा – ऍड. यशपाल ओहळ !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागात होणारा श्रद्धा आणि एकता सोसायटीचा पुनर्बाधणी प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बोगस कागदपत्राद्वारे नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवानगी देणाऱ्या नगररचना विभागाचे अधिकारी जयंत कांबळे यांची मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी तडकाफडकी बदली केली आहे.

दरम्यान, पालिकेचे संबंधित अधिकारी आणि काही पुढाऱ्यांच्या मनमानीने येथील सदनिकाधारकांना वेठीस धरले असून त्यांची दिशाभूल केली जात आहे. सदर पुनर्बाधणी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप ऍड यशपाल ओहळ यांनी वाशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. बेकायदा बांधकाम परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त अभय का देतायत ? असा सवाल करीत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ऍड यशपाल ओहळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

वाशी येथील बहुचर्चित श्रद्धा व एकता या दोन इमारतींच्या पुनर्विकासाला मिळालेला हिरवा कंदील चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१३ साली दिलेल्या संमती पत्राच्या आधारावर २०२१ साली बांधकाम परवानगी देण्यात आली ई व्ही होम्स आणि अरिहंत बिल्डर्स या बड्या बांधकाम व्यावसायिकांनी हा प्रकल्प विकसित करण्यास घेतला आहे. सुमारे ४३७ सदनिकाधारकांच्या संमतीने हा प्रकल्प साकारला जात असल्याचा दावा फोल ठरला आहे. २०१३ साली रहिवाशांचे संमती पत्र जोडताना फक्त सह्या करण्यात आल्या आहेत. जुन्या इमारतींना १.८ चा एफएसआय होता. पुनर्बांधणी प्रकल्पाला आता एफएसआय ४ आहे. मात्र सदनिकाधारकांना फक्त १८० से . फुटाचे घर देण्यात येणार आहे. सदनिकाधारकांना किती स्क्वेअर फुटाचे घर देणार याबाबत ठोस करार न करता सदनिकाधारकांना अंधारात ठेवून पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन मोठे षडयंत्र राबविले जात असल्याचा आरोप यावेळी ऍड. ओहळ यांनी केला. याबाबत नगरविकास विभागातील संबंधित अधिकारी राजेश पवार आणि जयंत कांबळे यांच्याविरोधात जनहित सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मिरजे व आरपीआय लोकसभा अध्यक्ष एड. यशपाल ओहोळ यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली. मात्र, आयुक्तांनी फक्त संबंधितांची बदली करून या प्रकरणाकडे कानाडोळा केला , असा आरोप यावेळी ऍड ओहळ यांनी पत्रकार परिषदेत केला. पालिकेचे नगर रचनाकार हेमंत ठाकूर यांनी लवकरच याबाबत सुनावणी लावू असे सांगितले आहे, मात्र संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी एड यशपाल ओहळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सदर प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, वाशी येथील श्रद्धा व एकता सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत तक्रारदारांच्या तक्रारीनुसार सदर दोन्ही सोसायट्यांचा अहवाल मागितला आहे. सदर अहवाल सादर करण्यासाठी दोन्ही सोसायट्यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ९ जुलैपर्यंत अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर अहवालाचे विशॆषण केले जाणार असून तक्रारदार आणि सोसायटी यांची पालिका आयुक्तांसमोर सुनावणी घेतली जाणार प्रतिक्रिया नवी मुंबई मनपाचे नगररचना अधिकारी हेमंत ठाकूर यांनी दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »