Press "Enter" to skip to content

बाळासाहेब ठाकरे कि दिबां पाटील ! नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे ?

महाविकास आघाडी – भाजपात राजकीय संघर्ष पेटला !

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पेटला असून आता नामकरणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे. विमानतळाला दिबांच्या नावासाठी भाजपने आग्रह धरला असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्या, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.

पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या समितीचे बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस नेते आर.सी.घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, कामगारनेते महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकाप नेते काशिनाथ पाटील, काँग्रेसचे नेते सुनील सावर्डेकर, शिवसेनेचे एकनाथ म्हात्रे, राष्ट्रवादीचे बळीराम नेटके, सावंत , सुदाम पाटील, शिवसेना नेते रामदास शेवाळे, रामदास पाटील, गणेश कडू, राजेश केनी, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, प्रदीप ठाकूर, दीपक घरत आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळ नामकरणासाठी दिबांच्या नावाचा इतका अट्टाहास होता, तर प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना तसा ठराव का केला नाही ? किंवा मग सहा महिन्यापूर्वी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली त्यावेळी हे नेते कुठे गेले होते ? जर यांना दि.बा.पाटील यांच्या नावासाठी झटायचे होते मग ६ महिने कोणाची वाट बघत होते ? आज राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करीत आहे आणि भाजपचे राज्यातील नेते सरकार पाडण्यासाठी नको त्या थराला जात आहेत. अशीच परिस्थिती आता पनवेल उरणमधील स्थानिक भाजप नेते करत आहेत, अशा शब्दात बबनदादा पाटील यांनी भाजपवर हल्लबोल केला.

विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे ? याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन नंतर आपण भूमिका मांडणार होतो. मात्र त्यापूर्वीच राजकारण करण्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तयारी दर्शवली. त्यानंतरही जासई येथे झालेल्या बैठकीमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, भाजपने आंदोलनाचे रणशिंग का फुंकले आहे, असा सवाल यावेळी बबनदादा पाटील यांनी केला. महाराष्ट्रात विमानतळाच्या नामकरणासाठी विधानसभेच्या ठरावाची आवश्यकता असते. मात्र त्यावेळी भाजपचे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आपल्या १०५ आमदारांना विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी विरोध करतील का ? याबाबत ते जाहीर भूमिका मांडतील का ? या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यावे, असे आव्हान बबनदादा पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »