Press "Enter" to skip to content

पार्थ फाऊंडेशनने आदिवासी पाड्यात राबवला मोफत राशन वाटप उपक्रम !

प्रतिनिधी, नवी मुंबई : कोरोनाच्या तडाख्यापासून कुणालाही वाचता आले नसून शहर असो वा गाव; गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. रोजंदारीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजूर-कामगार वर्गाचे पुरेशा अन्नधान्याअभावी अतोनात हाल होत आहेत. ह्या गंभीर परिस्थितीची दखल पार्थ पवार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेनं घेतल्यानंतर संस्थेच्या वतीनं आदिवासी पाड्यांवर मोफत राशन वाटपाचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. तळोजा येथील आदीवासी पाड्यांवर ८५ कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आलं. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधव सुखावले.

तळोजा भागातील पेंधर कातकरी पाडा व पेठाली कातकरी पाडा या दोन पाड्यांवर पार्थ पवार फाऊंडेशन संस्थेच्या वतीनं मोफत राशन वाटप करण्यात आले. गेले अनेक दिवस अन्नधान्याचा तुटवडा भासू लागल्यानंतर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न गावकऱ्यांना सतावत होता. त्यातच आता संस्थेनं पाड्यावरील ८५ कुटुंबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिल्यानंतर दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडलेल्या गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याठिकाणी कुणी जास्त शिकलेलं नसून बहुतांश लोकांचा घर हा रोजंदारीवर चालतो. मात्र कोरोना महामारीमुळे राज्य सरकारनं टाळेबंदी जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आर्थिक उत्पन्नाची चणचण जाणवू लागली. परिणामी, पोटापाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. अशा ह्या हलाखीच्या परिस्थितीत पार्थ पवार फाऊंडेशननं मोफत राशन वाटप करून आम्हाला व आमच्या कुटुंबाला सावरलं आहे. त्याबद्दल आम्ही श्री पार्थदादा पवार व पार्थ पवार फाऊंडेशनचे कायम ऋणी राहू, अशा शब्दांत गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

दरम्यान, यापूर्वी मुंबईजवळच्या घारापुरी बेटावरील गावांत तब्बल २०० कुटुंबांना पार्थ पवार फाऊंडेशननं मोफत राशन वाटप देऊ केलं होतं. युवानेते श्री पार्थदादा पवार यांना असलेली सामाजिक कार्याची ओढ लक्षात घेत ही संस्था गोरगरिबांपर्यंत मदतकार्य पोहोचवण्याचं काम करते. याप्रसंगी प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे, पनवेल जिल्हा सचिव प्रसाद ढगे पाटील, खारघर शहर राष्ट्रवादी सुरेश रांजवण, युवक पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर, अनुराग गायकवाड, नारायण गायकवाड, महेश पाटील व पार्थ पवार फाऊंडेशनची टीम उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »