Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये दररोज होतेय लाखो लिटर पाण्याची गळती !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा यंत्रणा यांचे अपुरे नियोजन यामुळे पनवेलकरांना मागील अनेक वर्षांपासून पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. सिडको क्षेत्रात तर पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. काही वर्षभरात पाणी गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे टँकर माफियांचे देखील चांगलेच फावले आहे.


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १० लाख एवढी लोकवस्ती आहे. खारघर, तळोजा , कामोठे या सिडको निर्मित विभागात अद्यापि मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरु असून दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. शहराची पाण्याची गरज वाढत आहे. पनवेलकरांना हेटवणे, एमजेपी व मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल मधील खारघर, तळोजा, कामोठे, आदी सिडको क्षेत्रात हटवणे व मोरबे धरणाकडून पाणी पुरवठा होता. मात्र, अपुऱ्या पाणी पुरवठामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन्स कमी व्यासाच्या असल्याने अगोदरच कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. त्यात अनेक पाईप लाईन्स या कमजोर झाल्या आहेत. अनेक पाईप लाईन्स गंजलेल्या आहेत. गंजलेल्या कमजोर पाईप लाइनमुळे अनेक ठिकाणी पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पनवेलमध्ये दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते.


पनवेल क्षेत्रात जिथे पाण्याची गळती होते , तिथे टँकर माफियांचा अड्डा बनलाय. तिथून मोटारीच्या साहाय्याने पाणी खेचून पाणी चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत.मात्र, याकडे प्रशासनाचे लक्ष कसे नाही , असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. टँकर माफियांना प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी अभय देत असल्याचे बोलले जात आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी जिथे पाणी गळती होतेय तिथे हजारो लिटर पाणी जमिनीवर सांडून वाया जात आहे. याकडे देखील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सिडको क्षेत्रात पाणी गळतीची समस्या वाढल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठावर होत आहे. पाण्याच्या पाईप लाईन्स लिकेज असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होते. त्यामुळे नागरिकांना पुरेसे मिळत नाही. पनवेल मनपाकडे बाळगंगा आणि ओवे कॅम्प हि स्वतःच्या मालकीची धरणे आहेत. मात्र, या धरणांचा विकास करण्यात पनवेल मनपा प्रशासनाने गांभीर्य न दाखविल्यामुळे शहरातील पाणी प्रश्नात भर पडत आहे.

पनवेल मनपा क्षेत्रातला खारघर हा सर्वात मोठा नोड आहे. येथील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढतेय मात्र, आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नाही. खारघरमधील सोसायट्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन्स या कमी व्यासाच्या आहेतच, पण त्या जुन्या असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहेत. पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन तात्काळ बदलण्याची गरज आहे. त्यासाठी पनवेल मनपा व सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. खारघरमधील पाणी प्रश्नाबाबत सिडकोवर अनेकदा हंडा मोर्चा काढला आहे.

  • हर्षदा अमर उपाध्याय
    नगरसेविका, पनवेल मनपा.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »