पनवेल : पनवेल महानगरपालिक क्षेत्रातील खाजगी शाळांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शालेय शिक्षण शुल्क वसूल करण्यासाठी शाळा व्यवस्थापन पालकांना वेठीस धरत आहे. फीज भरली नाही तर विध्यार्थ्यांना थेट ऑनलाईन शिक्षण सेवेतून बाहेर काढले जात आहे. मात्र, स्थानिक शिक्षण विभागाचा खाजगी शाळांच्या मन्मनीवर जराही अंकुश नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राज्य शासनानेच या प्रश्नाकडे थेट लक्ष द्यावे, खाजगी शाळांच्या मनमानीला लगाम घालावा , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहरजिल्हा युवक कार्याध्यक्ष शहाबाज पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना लेखी निवेदन दिले आहे.
कोरोना महामारीने सर्वांवर संकट आणले आहे. प्रत्येकाची कशी-बशी जगण्याची धडपड सुरु आहे. कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सध्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. मात्र, शालेय फीज मध्ये काहीही कमतरता झाली नाही. आर्थिक संकट आल्याने अनेक पालकांना मुलांची शालेय फीज भरणे कठीण झाले आहे. आम्ही थोडी थोडी फीज भरू अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, अनेक शाळांनी आपली मनमानी करीत फिजसाठी पालकांना वेठीस धरले असून अनेक विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाबाहेर काढण्याचा हातखंडा वापरत आहेत. याचा विपरीत परिणाम मानसिकतेवर होऊन त्यांचे भविष्य अंधारात अडकत आहे. पनवेल शिक्षण विभाग देखील याप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी युवकांद्वारा मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
खाजगी शाळांच्या मनमानीकडे पनवेल गट शिक्षण अधिकारी दुर्लक्ष का करताहेत ? पालक आज किव्हा उद्या फीज भरतील, मात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची शाळांची मजल गेली, विद्यार्थ्यांचा शिक्षण अधिकार खाजगी शाळा हिसकावून घेतायत, तरी देखील शिक्षण विभाग गप्प का ? पाणी कुठे मुरतंय ?
-शहाबाज पटेल
युवक कार्याध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहरजिल्हा






