कोकण दर्पण ! कोका LIVE
नवी मुंबई : नवी मुंबई मनपा कक्षेतील नोसिलनाका येथील प्रश्नांबाबत विभाग अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील नोसिनाका येथील हायमास्ट बंद असल्याने येथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत आता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी महापालिकेने ठराव मंजूर करून नामकरण केलेला नोसिल नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तत्कालिन नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या सहकार्याने नामकरण करून घेतला होता. बहुतांश अल्प संख्यांक, मागासवर्गीय लोक वस्ती असलेला हा परिसर असून हा चौक येथील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. २०१५ साली काही समाजकंटकांनी चौकातील वास्तूंची नासधूस करून जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणानंतर चौकाची सुरक्षितता लक्षात घेऊन रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक वार्ड ऑफिसर यांच्या ही बाब लक्षात आणून दिली होती तत्कालीन वाड ऑफिसर दत्तात्रय नागरे यांच्या सहमतीने स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चौकाचे सुशोभिकरण करून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतू परिस्थिती जशीच्या तशीच राहिली असल्याने शेवटी रिपब्लिकन सेनेच्या ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रकाश वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चातून निधी उभारून या चौकाचे सुशोभिकरण केले व आज ही वास्तू त्यांच्या सत्कार्याची प्रचिती देत उभी आहे स्थानिक नगरसेवकांनी या प्रकरणात बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. चौकात असलेल्या हायमास्ट दिवा देखील पालिकेने काढून घेतला असून त्याची विचारणा केली असता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम चालू असल्याचे कारण पुढे केले आहे वास्तविक असे कोणतेच काम चालू नसताना देखील स्थानिक रहिवाशांना दिव्या अभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या अशा भोंगळ कारभारामुळे पालिकेच्या कुचकामीपणावर स्थानिक रहिवासी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. दिव्या अभावी सीसीटीव्ही असून सुद्धा चौकातील वास्तूची समाजकंटक छेड काढून अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास पालिका संपूर्णतः जबाबदार राहील यात तिळमात्र शंका नाही. कारण गेल्या काही वर्षात अशा संवेदनशील घटना घडल्याच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदी आहेत. शिवाय सीसीटीव्ही मध्ये असलेले फुटेज हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशामुळे जनतेसमोर आल्यावाचून राहिलेले नाही. जर दिव्याचा प्रकाशच नसेल तर सीसीटीव्ही यंत्रणा असून देखील समाजकंटक प्रकाशा अभावी कोणतेही गैरकृत्य करण्यास मोकाट सुटतील याचे गंभीर परिणाम जर एखादा अनुचित प्रकार घडल्यास पहावयास मिळू नये याची काळजी घेणे पालिकेचे काम असून पालिकेने या गंभीर विषयावर लक्ष घालावे योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी येथील जनतेने नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.





