कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय रायगड किल्ल्याच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटातही दैनंदिन क्षणाक्षणाला घडणाऱ्या घडामोडींचा वृत्त वेध घेणाऱ्या पत्रकार मंडळींनी थोडीशी उसंत घेत सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत लपलेल्या महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट देऊन इतिहासाची पाने चाळली.
प्रारंभी , अर्बन हट बेलापूर येथून मिनी बसने प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे ,शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोहर मढवी
यांनी फोनवरून संपर्क साधत पत्रकारांना सुखकर प्रवासासाठी आणि अभ्यास दौऱ्यातून काही नवीन शिकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मन प्रफुल्लीत करणाऱ्या भक्ती गीतांनी सुरुवात झाली . त्यानंतर बाल शिवाजी जय जय महाराष्ट्र माझा अशा गीतांनी रायगडाकडे २३ पत्रकारांनी आगेकूच केली . प्रवासा दरम्यान अनेकांनी महाराष्ट्राच्या विविध कला-संस्कृती परंपरेचा आणि आपल्याला आलेले अनुभव तुम्हारी चर्चेतून मांडले .उंच डोंगर , नागमोडी वाटा सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि मनात एक उत्सुकता घेऊन महाराजांच्या रायगड किल्ल्यावर सर्व पत्रकार दाखल झाले. सुमारे ८२० मीटर उंच आणि २७०० फूट उंचीच्या गिरिदुर्ग प्रकारातील शत्रूला तर सोडाच मुंगीला देखील प्रवेश करता येणार नाही असा अभेद्य रायगड किल्लावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. रायगड किल्ला एकच नाव नाही विविध पंधरा नावे आहेत ,परंतु मूळ नाव रायरी किल्ला असे आहे.उंच उंच डोंगर आणि आकाशाने हातात हात घातलेले रायगडाचे मनमोहक दृश्य सर्वांच्याच नजरेत काही क्षणातच भरले.
अभेद्य चिरेबंदी असा रायगड किल्ला सहज सर करणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी हिरकणी टोकावरून गडाकडे जाण्यासाठी स्वर्गीय जोग यांच्या माध्यमातून साकारलेल्या रोप वेचा आधार घेतला . पायथ्या पासून सुरू झालेला रोप-वे सात मिनिटातच गडावर घेऊन गेला. किल्ल्याचा विस्तृतपणे आढावा घेता यावा याकरिता किल्ले रायगडचे अभ्यासक रमेश औकिरकर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटनेचा साक्षीदार असलेल्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर झाला आणि तोच किल्ला पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले. किल्ल्यावर असणारे प्रवेशद्वार दगडी बांधकाम महाराजांच्या आठ पत्नींचे निवासस्थान, महादरवाजा , हत्ती तलाव , गंगासागर तलाव , मेना दरवाजा, राजभवन ,नगारखाना ,बाजारपेठ ,वाघदरवाजा , टाकसाळ टकमक टोक ,,जगदीश्वर मंदिर ,महाराजांची समाधी अशा २२ स्थळांचा आढावा पत्रकारांनी घेतला. रायगडचा किल्ला हा धर्मरक्षणासाठी जतन करणे आवश्यक असून प्रत्येकाने या किल्ल्याला आवर्जून भेट देण्यासाठी यावे असे आवाहन पत्रकारांनी यावेळी केले . शिवाजी महाराजांच्या स्तंभाला सर्वांनी डोके टेकून नतमस्तक होत मानाचा मुजरा केला अन नवी मुंबई कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या पत्रकारांचे जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेशवरे यांनी आभार मानले.





