Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत सत्तापरिवर्तन होणार – जितेंद्र आव्हाड !

कोकण दर्पण ! कोकण LIVE

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल, सीबीडी गड पूर्णतः भाजपचाच असेल, असे बेधडक विधान भाजप नेते तथा  आमदार यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील एल्गार पुकारला आहे.

मागील आठवड्यात सीबीडी प्रभाग 102 व 104 मध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्याला जशाच तसे उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने सीबीडी प्रभाग 102 व 104 मध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एल्गार पुकारला आहे. कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सीबीडी विभागात भाजपचा एकही नगरसेवक जिंकणार नाही, याची दक्षता महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, गणेश नाईकांना दाखवूनच देऊ, अशी आक्रमक भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजप पेक्षा गणेश यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नवी मुंबईच्या युद्धाचे सेनापती पद आहे. नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, निरीक्षक प्रशांत पाटील हे देखिल नवी मुंबई जिंकण्यासाठी सरसावले आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि गणेश नाईकांविरोधात अधिक आक्रमक युद्ध सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार केल्यानंतर महाविकास आघाडीने सीबीडी बेलापूरकडे लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय सीबीडी बेलापूर येथे आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाच्या विभागातील मनसबदारी आपल्याकडे असली पाहिजे,हे महाविकास आघाडीचे यामागचे गणित आहे. सीबीडी १०२, १०३ व १०४ मध्ये भाजपचे नगरसेवक आहेत. येथे पूर्वापार गणेश नाईक समर्थकांची चलती आहे. मात्र, सीबीडीत गणेश नाईकांची नव्हे तर राष्ट्रवादीची चलती आहे, गणेश नाईक राष्ट्रवादीत होते म्हणून त्यांचे चालत होते, आता ते भाजपात गेलेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात गेले म्हणजे राष्ट्रवादीची ताकद कमी होत नाही, राष्ट्रवादीचा विचार संपत नाही, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतो. त्यामुळे सीबीडी गड आमचाच आहे , असा ठाम विश्वास त्यांना आहे. त्यामुळे आपले प्राबल्य पुन्हा दाखविण्यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. सीबीडी प्रभाग १०४ मधील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ ज्योती धनाजी खराडे व प्रभाग १०२ मधील उमेदवार अस्मिता प्रशांत पाटील यांच्या प्रचाराचा जणू धुरळा काढला. जनसंपर्क कार्यालयांच्या उदघाटनाचे औचित्य साधून महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह भरला आहे.
मागील अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांच्या पाठीशी असलेले सीबीडी विभागातील शीख समाज बांधवांनी मोठ्या संख्येनें महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थिती दाखवली. सीबीडी प्रभाग १०४ व १०२ मधील विजयाचा हा मोठा टर्निंग पॉईंट मानला जातो. कारण प्रामुख्याने १०४ प्रभागातून माजी नगरसेवक जयाजी नाथ यांच्या विजयाची  हि किनार मानली जात होती. आज सीबीडी मधून हे राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारची भूमिका यामुळे नवी मुंबईतील शीख बांधवांचे मतांतर बदलत असल्याचे स्पष्ट चित्र नवी मुंबईत दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीख बांधवांची ताकद महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील, असे चित्र सध्या सीबीडी , नवी मुबंईत दिसत आहे.  

कोकण दर्पण ! कोकण LIVE

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »