नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वीज कंपनीने पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलाच्या विरोधात तुर्भे येथे भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक ६९ च्या माध्यमातून परिवहनचे माजी सभापती अन्वरभाई शेख व झीनत अन्वर भोईर – शेख यांच्या पुढाकारातुन निदर्शने व निषेध करण्यात आले.यावेळी अनेक कार्यकर्ते व रहिवाशी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून संपुर्ण जग कोरोना महामारी सारख्या भयानक संकटातून अजूनही बाहेर आलेले नाही . महाराष्ट्र राज्यात तर हजारो लोकांनी आपले प्राण गमावलेत. कित्येक कुटुंब उध्वस्त झाली. लाखो कर्तबगार नागरिकांचे नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. शेकडो वर्षातून आलेल्या जागतिक भयानक संकटात गोरगरीब नागरिकांना राज्य सरकार नावाच्या मायबाप यंत्रणेवर सर्वाधिक विश्वास व मदतीची गरज असताना महाराष्ट्र राज्य सरकार प्रत्येक बाबतीत अविश्वासाला पात्र ठरत आहे, असा टोला नवी मुंबई महापालिका परिवहनचे माजी सभापती अन्वरभाई शेख यांनी यावेळी लगावला.
संपूर्ण वर्षभराच्या लॉकडॉऊन दरम्यान नोकरी-धंदे बंद पडल्यामुळे हवालदिल ,बेजार झालेल्या ,कर्जबाजारी झालेल्या नागरिकांपुढे अवास्तव वाढीव वीजदेयके हे जीवघेणे संकट आता उभे ठाकले आहे. विशेषतः नवी मुंबई शहरातील तुर्भे भागातील झोपडपट्टी परिसरात कित्येक महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार वारंवार संबंधित महावितरण व्यवस्थापनाला अर्ज,निवेदन देऊन विजदेयक कमी कारण्यासंदर्भात विनंत्या करीत आहोत, परंतु निगरगट्ट मायबाप राज्य सरकार असंवेदनशीलपणे आमच्या गोरगरीब झोपडपट्टी भागातील नागरिकांवर दया दाखवीत नाही, कोणत्याहीप्रकारे सवलत देत नाही.आतातर आमच्या झोपडपट्टी परिसरात बळजबरीने विजजोडणी कापण्यासाठी विद्युत महामंडळाचे प्रशासन घरोघरी हुकूमशाही पद्धतीने कारवाई करीत आहे. अशा जाचक कारवाई विरोधात आम्ही तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक ६९ च्या माध्यमातून निषेध आंदोलन केल्याची माहिती अन्वरभाई शेख यांनी दिली. यावेळी समाजसेविका झीनत अन्वर भोईर – शेख, ऊषाताई मनोरे , कलाताई पवार , लता मोरे , आम्रपाली सुरवसे , मधु ,प्रभुनाथ राम , उत्तम सुरवसे , सुनील शेजाव , लालू यादव ,गुरुदास वाघचौर , कृष्णा कांबळे , आकाश सूर्यवंशी , समीर शेख , काशीनाथ उपस्थित होते.
कोकण दर्पण.





