Press "Enter" to skip to content

पनवेल मधील आदिवासी समाज सरकारी योजनांपासून वंचित !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वातंत्र्य काळापासून जात प्राणपत्र न मिळाल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिला आहे. वंचित आदिवासी बांधवांच्या न्यायहक्कासाठी आता नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी आवाज उठवला असून आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करून त्यांना तात्काळ जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी हर्षदा उपाध्याय यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर विभागात बेलपाडा , हेदोरवाडी, चाफेवाडी आणि फणसवाडी या चार आदिवासी वाड्या आहेत.येथे सुमारे ३०० कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत.मात्र, त्यांच्याकडे जातीचे दाखले नसल्याने आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. अनेक योजनांपासून हा समाज वर्षोनुवर्षे वंचित आहे.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत. विक्स हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असून तो झालाच पाहिजे.
या दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर प्रभाग क्र- ५ मधील समाविष्ट असलेल्या आदिवासी वाड्यातील नागरिक जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यापासून वंचित राहत असल्यामुळे पनवेल तहसील विभागांकडून कॅम्पच्या माध्यमातून जातीचे दाखले उपलब्ध करून मिळावे अशी मागणी हर्षदा उपाध्याय यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केली आहे .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »