पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : देशातील नवीन कृषी विधेयकाला मागे घेण्याकरिता मागील ४० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता समाजसेविका डॉ. वर्षा चौरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मनपा क्षेत्रातील कामोठे सर्कल ते कळंबोली सर्कल पर्यंत हातात राष्ट्र ध्वज घेवून शांती मार्च काढण्यात आला. यावेळी विध्यार्थी संघटनेचे नेते शाहनवाज खान, योगेश निपाने, डॉ रुक्मिणी धायगुडे, रोशन शेख, इरफान शेख, शकील अहमद आदी उपस्थित होते.
सरकारच्या शेतीविषयक काळ्या कायद्यांचा जाहीर विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतातील शेतकरी आंदोलन करत आहेत. गेले ४० दिवसांपेक्षा अधिक काळापासून देशातील शेतकरी राजधानी मध्ये ठाण मांडून बसले आहेत. पण भारतभर शेतकऱ्यांचे चालू असलेले आंदोलन दडपण्यासाठी, सरकार पालकांच्या भूमिकेऐवजी भक्षकाच्या भूमिकेत वागत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ वर्षा चौरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आम्ही देशाचे जबाबदार नागरिक आहोत, शेतकरी आपला अन्नदाता आहे , या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपलं कर्तव्य आहे, म्ह्णून अन्नदात्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता कामोठे सर्कल ते कळंबोली सर्कल पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आल्याची प्रतिक्रिया शाहनवाज खान यांनी व्यक्त केली.
कोकण दर्पण.





