नवी मुंबई विमानतळ नामांतर !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाला स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी नवी मुंबईकरांकडून केली जात आहे. विमानतळासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. मात्र त्यावर तोडगा
काढण्याऐवजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई यांनी नामकरण बाबत वेगळाच अट्टाहास कशासाठी ? असा सवाल करीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या मागणीला विरोध केला आहे.
विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत नामकरणाच्या विषयात एकनाथ शिंदे लक्ष घालत आहेत ही खेदजनक बाब आहे अशी भूमिका मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
नवी मुंबईतील जमिनी जेव्हा जे एन पी टी, सिडको १९८० च्या दरम्यान ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला देण्यात येत होता. दरम्यान, स्व दि. बा पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली उरण परिसरात मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. आंदोलनाची तीव्रता पाहून ब्रिटिश सरकारने १८९४ चा अन्यायकारक भूसंपादन कायद्यात बदल करत भूमिपुत्रांना १२.५% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा केला. कुशल संघटक, आगरी कोळी समाजासाठी शैक्षणिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात स्व. दि. बा पाटील यांचे योगदान आगरी कोळी समाज तसेच नवी मुंबईकरांसाठी अमूल्य होते.अनेक प्रकल्पग्रस्तांचा योगदानाचे प्रतिक म्हणून नवी मुंबईतील विमानतळाकडे पाहिले जाते.
मात्र दुसरीकडे शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे स्व. दि.बा.पाटील यांचा योगदानाचा विसर नगरविकासमंत्री शिंदे यांना पडला आहे का? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत नगरविकासमंत्री शिंदे यांनी भांडवलदारांशी नाळ जोडली की काय अशी शंका प्रकल्पग्रस्त तसेच सर्व नवी मुंबईकरांना सतावत असल्याचे गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले.
कोकण दर्पण.





