पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील दहा वर्षांपासून रखडलेला तळोजा वसाहतीतील स्मशानभूमीचा प्रश्न आता राज्य सरकारच्या कोर्टात पोहचला आहे.सिडकोने तळोजा कॉलनी वसवून तब्बल दहा वर्षे होऊन गेली, मात्र सिडकोच्या ढिसाळ नियोजनामुळे एवढ्या मोठ्या वसाहतीला स्मशानभूमी देण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करायचे कुठे ? असा गंभीर प्रश्न तळोजामधील नागरिकांना भेडसावत आहे. पाणी, दिवाबत्ती, सुरक्षा आदी नागरी समस्यांनी ग्रासलेल्या तळोजावासीयांना प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील मरणयातना सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांनी सिडकोच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिडको हि राज्य शासनाची व्यापारी विकास संस्था आहे. रस्ते आणि गटारे बांधून शहर विकसित केल्याचा देखावाच अधिक असल्याचे आता उघड झाले आहे. हेच आता तळोजा वसाहतीत सिद्ध झाले आहे. तळोजा फेज १ आणि २ येथे मोठ्या वसाहती उभ्या करून जनतेला भुरळ पाडली, मात्र नागरिकांना आवश्यक असलेल्या प्राथमिक नागरी गरजा पुरविण्याचा सिडकोला विसर पडल्याचे दिसत आहे. तळोजा फेज १ वसाहतीत जर कोणाचा मृत्यू झाला तर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कळंबोली, खारघर किंव्हा अन्य ठिकाणच्या स्मशानभूमीत न्यावे लागते. कोरोनाच्या काळात तर येथील नागरिकांना मोठ्या गैरसायीला सामोरे जावे लागले.
जगायला पाणी, रस्ते , गटारे , सुरक्षा हवी म्हणून येथील नागरिक मागील दहा वर्षांपासून लढत आहेत. मात्र , सिडको आणि अन्य संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत नाही. येथे सर्वच धर्माचे लोक राहतात. मात्र ,येथे स्मशानभूमीच नाही. त्यामुळे, जगताना आणि मारताना देखील यातना अशा संकटात येथील नागरिक अडकले आहेत.
आता तळोजावासीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न राज्यशासनाच्या कोर्टात पोहचला आहे. तळोजा येथील रहिवाशी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फारुख पटेल यांनी सदर प्रश्न आता राज्य सरकारपुढे मांडला आहे. वसाहत उभारलीत मग नागरीसुविधा कोण देणार अशी येथील नागरिकांची झालेली भावना फारुख पटेल यांनी सरकारपुढे मांडली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक , रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तळोजावासीयांची व्यथा मांडली आहे. सदर प्रश्नाबाबत सिडको प्रशासनाला देखील लेखी कळविले आहे. सिडकोने तळोजा सेक्टर १५ मध्ये स्मशानभूमी , दफनभूमीसाठी भूखंड देऊ केला होता. मात्र, सिडकोच्या लेटलतीफ कारभारामुळे सर्वकाही बासनात गुंडाळून राहिले आहे. दरम्यान, सिडकोने तळोजा फेज १ मध्ये सर्व धर्मीयांसाठी स्मशानभूमी , दफनभूमी बांधावी, शासनाने सिडकोला तत्काळ कार्यवाही करण्याचे तसे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी फारुख पटेल यांनी केली आहे.
कोकण दर्पण.





