तळोजामधील पाणी प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील अनेक वर्षांपासून पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहेत. सदर प्रश्न सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी आंदोलने व पाठपुरावा करून देखील येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अखेर, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव प्रसाद ढगेपाटील यांनी तळोजा येथील गंभीर बनलेला पाणी प्रश्न रायडग जिल्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या जनता दरबारात मांडला. दरम्यान, अदिती तटकरे यांनी सिडको, मनपा अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत तळोजा येथील पाणी प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
गेले चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील हेदेखील या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करत आहेत. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी वेळोवेळी सिडको अधिकारी यांना विषयासंदर्भात विचार करण्यासाठी भाग पाडले होते. परंतु सिडको अधिकारी ,पनवेल महानगरपालिका अधिकारी, व एमआयडीसी अधिकारी तात्पुरती उपाययोजना करून जनतेची दिशाभूल करण्यामध्ये व्यस्त राहिले. २०१९ मध्ये सिडकोकडून सदर पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सेक्टर ८ व सेक्टर २४ या ठिकाणी प्रत्येकी ५ एमएलडी क्षमतेचे जलकुंभ उभारण्यासाठी निविदा काढून जे एम म्हात्रे इंफ्रास्ट्रक्चर या एजन्सीला काम दिले होते.परंतु त्यावरही काही अंमलबजावणी झाली नाही.एका बाजूला एमआयडीसी कडून होणारी कमी दाबाच्या पाण्याची गळचेपी व दुसऱ्या बाजूला प्रशासनाची सदर प्रश्न सोडवण्यास संदर्भातली दिरंगाई याला जनता कंटाळली आहे. आता सदर प्रश्नांची गंभीर दखल घेत अदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिका-यांची खरडपट्टी केली आहे. तत्काळ जलकुंभाच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
गेल्या अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील यश आले नाही. परंतु पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी तत्काळ आदेश दिल्यामुळे सदर प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोकण दर्पण.





