नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : देशातील शेतकरी आणि कामगारांना बाजूला फेकून भांडवलदार कंपन्यांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे. चुकीचा कायदा आणून हे नादान सरकार देशातील शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावतील, असा घणाघात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी मंगळवारी वाशी येथे बोलताना केला. आम्ही अन्नदात्या बळीराजासोबत आहोत, अशी ठाम भूमिका नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी यावेळी मांडली.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस व नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने वाशी येथील शिवाजी चौक येथे आंदोलन करीत शेतकरी व कामगारांच्या न्यायहक्कासाठी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी दोन्ही काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी उपस्थित राहून भाजप सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोकशेठ गावडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक , नवी मुंबई मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई घाडगे, काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा उज्वलाताई साळवे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ काळे, बेलापूर विधानसभा अध्यक्ष जतीन धनावडे, वाशी तालुकाध्यक्ष सतनाम नागपाल, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा श्वेता खरात, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सर्वच जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी उपस्थितीत होते.
कोकण दर्पण.





