पनवेल, दि.10 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांचे हस्तांतरण आज पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आले. याबाबतचा हस्तांतरण करार आज विधानभवनामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, पनवेलचे आमदार मा.श्री.प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मा.श्री.महेश बालदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारावर सिडको महामंडळातर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉ.श्री.संजय मुखर्जी यांनी तर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक श्री.गणेश देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मा.श्री.मनुकुमार श्रीवास्तव, मा.मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव श्री.भुषण गगराणी, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एमएसआरडीसी श्री.राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक श्री.कैलास शिंदे, उपायुक्त श्री.सचिन पवार, तसेच महापालिका आणि सिडको महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
दिनांक 1 ऑक्टोबर 2016 ला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी तसेच नागरिकांना एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी सिडकोकडील सेवा सुविधा महापालिकेकडे हस्तांतरीत होणे गरजेचे होते. याचाच एक भाग म्हणून प्रथमत: 2018 ला सिडकोकडील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. तर आता पाणीपुरवठा वगळून उर्वरीत सर्व सेवा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन महानगरपालिकेकडे आल्यापासून महानगरपालिकेने उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय स्तरावर मानांकनही प्राप्त केले आहे.
आज महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या सेवांमध्ये फूटपाथ, रस्ते, पथदिवे, विद्युत सेवा, सीवर लाईन्स, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सांडपाणी पंप हाऊस, अग्निशमन केंद्र, उपकरणे, स्मशानभूमी, दफन भूमी (स्मशानभूमी), गार्डन, कम्युनिटी सेंटर, खेळाची मैदाने इत्यादींचा समावेश आहे. येथून पुढे या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल, दुरूस्ती, सुधारणा तसेच विकास ही कामे पनवेल महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेस सिडकोकडील विविध सेवांचे हस्तांतरण !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »




