Press "Enter" to skip to content

भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने शिवजयंती दणक्यात साजरी !

भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने शिवजयंती दणक्यात साजरी.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती खारघर मधील गोखले शाळेच्या मैदानात उत्साहाने साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने शिवचरित्रावर आधारित पोवाडा नृत्य व गायनाचे आयोजन करण्यात आले. रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, कथक स्टुडिओचे विद्यार्थी व श्री दुर्गामाता व्यापारी संस्था व महिला बचत गट यांच्या माध्यमातून शिवचरित्रावर नृत्य सादर करण्यात आले.

शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित संगीत दरबार ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून हरीश मोकल यांनी पोवाडा सादर केला तसेच भाजपचे जेष्ठ नागरिक अशोक आंबुर्ले यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सदर केले तर पत्रकार संजय महाडिक यांनी दोनच राजे येथे जाहले हे गीत सुमधुर आवाजाने सादर केले.
भगवे फेटे, भगवे झेंडे, भगव्या साड्या व कुर्ते यामुळे तयार झालेले भगवेमय वातावरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, भारत माता की जय अश्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळाला खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला तर सर्व नगरसेवकांनी दीपप्रज्वलित करून अभिवादनन केले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्याशिवाय विविध सोसायटीचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, परिसरातील नागरिक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी पाच हजारच्या वर संख्येने उपस्थित राहून स्नेहभोजनासह शिवचरित्रावर आधारित या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेतली असे या कार्यक्रमाचे प्रमुख व मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी सांगितले.