Press "Enter" to skip to content

लोकनेते दि बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये विविध सामाजिक उपक्रम !

लोकनेते दि बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये विविध सामाजिक उपक्रम !

नवी मुंबई वाशी :- लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वाशी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते . लोकनेते दि बा पाटील यांच्या १३ जानेवारी २०२३ रोजी असणाऱ्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, जासई आणि पनवेल येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.*

    यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दशरथदादा पाटील यांनी सांगितले की, मुंबई, पालघर सह ठाणे व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र बांधवांसाठी दि बा पाटील ऊर्जास्रोत आहेत. उरण येथील जासई मधील  लोकनेते दि बा पाटील   यांच्या ऐतिहासिक  स्मारकाजवळ १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दि बा यांना अभिवादन तसेच विविध कार्यक्रम व सायंकाळी ५ ते ७ दरम्यान जयंती निमित्ताने मार्गदर्शन सभा होईल, त्याचवेळी रोजगार मेळाव्यातील तरुणांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात  शिखर परिषदेच्या वतीने सकाळी १० ते ४ दरम्यान भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबई येथील  कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे दि बा  पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर व सर्वसमावेशक भव्य रोजगार मेळावा असे कार्यक्रम मुख्य शिखर समितीने आयोजित केले असून या कार्यक्रमात  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी केले आहे .
      यावेळी व्यासपीठावर लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, शिखर समिती सदस्य व माजी विरोधी नेते दशरत भगत, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ राजेश पाटील, दिपक पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, प्रताप पाटील, सुरेश वास्कर, दिनानाथ पाटील, प्रकाश पाटील, नितेश वैती आदि मान्यवर उपस्थित होते . दशरथ पाटील पुढे म्हणाले की, विमानतळ नामकरणानंतर आता प्रकल्पग्रस्तांचा गावठाण विस्तार, सिडकोच्या धर्तीवर एमआयडीसी प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांना मोबदला असे विषयावर शिखर समितीचे लक्ष केंद्रित असणार आहे. दि.बा.पाटील यांचे  प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले योगदानाबद्दल भावी पिढीला माहिती व्हावी यासाठी दि बा पाटील यांचे भव्य स्मारक उभे करण्यासाठी शिखर समिती लवकरच प्रयत्न करणार असल्याचे सांगत नुसता पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नाही त्यात त्यांनी केलेले आंदोलन, आणि प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेला लढा या संपूर्ण जीवनप्रवास इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा असे स्मारक उभे करण्याचा शिखर समितीचा मानस असल्याचे दशरथ पाटील म्हणाले.
 दि. बा. पाटील यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांची माहिती व समिती कडुन पुढील काळात प्रकल्पग्रस्तांसाठी हाती घेण्यात येणार आंदोलन व मागणी संदर्भात माहिती देण्यासाठी शिखर समितीच्या वतीने वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विस्तृत स्वरूपात देण्यात आली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »