लहान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या ! भाजप महिला मोर्चा !
पनवेल : लहान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने तळोजा पोलिसांकडे केली आहे. तळोजा येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचारानंतर पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमल यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने तळोजा पोलिसांची भेट घेऊन सदर मागणी केली.
घरात AC रिपेअर करायला आलेल्या मॅकेनिकने ५ वर्षीय मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रकार घडला. सदर प्रकारामुळे तळोजा परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक ही केलेली आहे. मात्र, अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधील धास्ती वाढली आहे.
या घटनेची तात्काळ दखल घेत भाजपा महिलामोर्चा पनवेलच्या पदाधिकारी यांनी पो.स्टे ला भेट दिली व परीवाराची चौकशी केली. यावेळी महापौर डॉ कविता चौतमल यांच्यासह भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी , महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, भाजप महिला मोर्चा रायगड उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.
आपल्या घरी कोणी अनोळखी व्यक्ती टीव्ही, फ्रिज, ए.सी ,पंखा रिपेयर करण्यासाठी आलातर पहिल्यांदा त्याची संपूर्ण माहिती घ्या. लहान मुले, मुली एकटे घरी असताना त्यांना बोलवू नका. आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ कविता चौतमल,गीता चौधरी, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील यांनी केले.





