कामोठे कॉलनी फोरमची आक्रमक भूमिका !
पनवेल : कामोठे शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विशेषतः कामोठे सेक्टर-९ मधील ड्रेनेज लाईन ओव्हर फ्लो होऊन वाहत असून गटारातील मलमूत्र रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, येथील ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक डॉ सखाराम गारळे आणि ऍड समाधान काशीद यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी कामोठे सिडको कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
यावेळी पनवेल महानगर कॉलनी फोरमच्या नेत्या तथा नगरसेविका लीना गरड, कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, कॉलनी फोरमचे सागर अलदर, सुनिल आडे, सत्यजित तांबे तसेच कॉलनी फोरमचे अनेक सदस्य, रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी, कामोठे सेक्टर 9 मधील सांडपाणी प्रश्न, सेक्टर-९ मधील ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्याच्या मागणीबाबत कामोठे सिडको कार्यालयाला निवेदन देण्यात आले. दरम्यान, सेक्टर 9 येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सिडकोने दिले.





