Press "Enter" to skip to content

पनवेल मनपाच्या नाले सफाईत भ्रष्टाचार ? आयुक्त साहेब, नाले सफाईकडे लक्ष द्या !

नालेसफाई पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना बिले देऊ नये : लीना गरड !

पनवेल : पावसाळ्यापूर्वी पनवेल महापालिकेच्यावतीने नालेसफाई सुरु करण्यात आली. खारघर मधील काही ठिकाणी नालेसफाई सुरू केली. मात्र, नालेसफाई नावापुरती झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खारघर कॉलनी फोरमने नाले सफाईची पाहणी करीत पनवेल मनपाने केलेल्या नाले सफाईची पोलखोल केली आहे. ठेकेदारांनी फक्त नावाला नाले सफाई केल्याचा दावा लीना गरड यांनी केला आहे.
दरम्यान, जो पर्यंत खारघर आणि पनवेल महानगरातील संपूर्ण नाले सफाई होत नाही, तो पर्यंत संबंधित ठेकेदारांना बिले देऊ नयेत, अशी मागणी खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष तथा नगरसेविका लीना गरड, कॉलनी फोरमचे समन्वयक मधू पाटील, ऍड. बालेश भोजने यांनी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. नालेसफाई करताना फक्त मॅनहोल तसेच नाल्यावरील झाकण खालील सफाई केली आणि नाल्याच्या आजूबाजूला सफाई झालेली नाही. पहिला पाऊस येण्याआधी सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्यायला हवे होते मात्र दिखाव्यापुरता काम सुरू असल्याचे लीना गरड म्हंटले आहे.

स्वतः सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघर नालेसफाईचा पाहणी दौरा केला होता. मात्र हा पाहणीदौरा होता की आणखी काय हा संशोधनाचा विषय आहे. दौरा करत त्यांनी काय सिद्ध केले, असा सवाल लीना गरड यांनी केला आहे. कारण होत असलेल्या नालेसफाई मध्ये नाल्याच्या आतमधील गाळ , माती तशीच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याला अडथळा निर्माण होतो. आत मधून काढलेली माती तिथेच बाजूला टाकण्यात येते. आणि तीच माती पुन्हा नाल्यात जाते, त्यामुळे नाले सफाईकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे , असे लीना गरड म्हणाल्या.