नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वान, हाँगकाँग मध्ये आढळलेल्या ओमिक्रोन या कोव्हीडच्या नव्या व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने दक्षता घेण्याचे सूचित केले असून त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभाग व विभाग अधिकारी यांची वेबसंवादाव्दारे तात़डीने बैठक घेत अधिक सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
कोरोना बाधितांची दैनंदिन रूग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसत असली तरी कोरोना अजून संपलेला नाही हे लक्षात घेत महानगरपालिकेने दैनंदिन कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण 7 हजारापर्यंत राखले आहे. त्यातही ज्याठिकाणी कोरोनाबाधित आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाचे टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. *टेस्टींगचे प्रमाण अजिबात कमी होऊ न देता नव्या व्हॅरिएन्टच्या पार्श्वभूमीवर टेस्टींगमध्ये आरटी-पीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड लसीकरणाच्या पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असले तरी *दुस-या डोसचे सध्या 67 टक्के साध्य झालेले उद्दिष्ट लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या ‘हर घर दस्तक अभियान’ प्रभावीपणे राबविले जात असून त्यासोबतीनेच ‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मार्केट क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी रूग्णवाहिका थांबवून केले जाणारे लसीकरण तसेच रेल्वे स्टेशनवरील लसीकरण रेल्वे स्टेशन्समध्ये वाढ करून अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले.*
कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या मर्यादीत झालेली दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोव्हीड सुरक्षा नियम पालनाच्या दृष्टीने काहीशी शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात घेणे व मास्कचा वापर अनिवार्यपणे करणे अत्यंत गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोनाचा व्हेरिएंट आपल्याकडे येऊ नये याकरिता शासकीय पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र नागरिकांनी समाजात वावरताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करून कोरोना विषाणूचा प्रसार रोखावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.*
कोव्हिडचा धोका अद्याप टळलेला नाही ! आयुक्त अभिजीत बांगर यांचे नवी मुंबईकरांना सतर्कतेचे निर्देश !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »