नवी मुंबई : कोव्हीड कालावधीमध्ये कोव्हीडमुळे दोन पालक अथवा एक पालक दिवंगत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची कल्याणकारी योजना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामधील पात्र 55 लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख – नाईक आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वाशी तालुका विधी सेवा समिती आणि नवी मुंबई वकिल बार असोशिएशनमार्फत डॉ.डी.वाय.पाटील विधी महाविदयालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये बालदिनाचे औचित्य साधून बालकांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजनेचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख – नाईक, महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संध्या अंबादे, डी.वाय.पाटील विधी महाविदयालयाचे प्राचार्य श्री.अजय पाटील, महापालिकेचे विधी अधिकारी श्री. अभय जाधव, नवी मुंबई बार असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ॲड. अक्षय अशोक काशिद व असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
कोरोना कालावधीत ज्या बालकांनी आपले एक अथवा दोन्ही पालक गमावलेले आहेत त्यांच्या संगोपनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ही योजना अत्यंत चांगली असून आज या योजनेचे वितरण करताना अतिशय समाधान लाभत असल्याचे मत याप्रसंगी बोलताना नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख– नाईक यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने या योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असून त्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी हे अर्थसहाय्य अतिशय मोलाचे ठरेल असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सांगितले. प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांसाठी व महिलांसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली.