नवी मुंबई:- सीवूड्स नवी मुंबई सेक्टर-38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणाऱ्या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत, महामंत्री श्री. विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, उपाध्यक्ष पुण्यनाथ तांडेल, न.मुं.म.पा. कार्यकारी अभियंता अजय संखे, उपअभियंता कल्याण कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता अनुजा सासवडकर, वात्सल्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, मच्छिंद्र तांडेल, अमित मढवी तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नवी मुंबई सीवूड्स से-38 भूखंड क्र. 13 येथे उभारण्यात येणाऱ्या ओल्ड एज होम वास्तूच्या बांधकामाकरिता सुमारे साडे चार कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून आमदार निधीतूनही रु. 50 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. मे. डेल्टाटेक कंस्ट्रक्शन प्रा.लि. कंपनी मार्फत सदरचे बांधकाम सुरु असून 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये सदरचे काम पूर्ण करून ज्येष्ठासाठी खुले करण्यात येणार आहे. ओल्ड एज होम ज्येष्ठ नागरिक भवन च्या या वास्तूमध्ये स्टील पार्किंग, कार्यालय, किचन कम डायनिंग हॉल, टोयलेट ब्लोक, स्टेयर केस, लिफ्ट, स्टेज, योगा रूम, स्टोर रूम, मेडिकल रूम तसेच वृद्धांना राहण्याकरिता खोल्या बांधण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, वयोवृद्ध दाम्पत्यांकडून इच्छामरणाच्या मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असून ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली असून मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना ओल्ड एज होम मध्ये पाठविण्याचा विचार वाढायला लागला आहे. नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा ज्येष्ठांना आधार देण्याची गरज आहे. त्यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ येऊ नये याकरिता नवी मुंबईमध्येही ओल्ड एज होम उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला व नवी मुंबई महानगरपालिकेने ते उभारले. याच अनुषंगाने महापालिका अधिकारी व अभियंता यांज्सः पाहणी दौरा केला असून सदरचे बाधकाम प्रगतीपथावर असल्याने लवकरच या वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन उभारल्यास त्यांनाही एक जगण्याची आशा निर्माण होईल, असा संदेशही त्यांनी दिला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांचे आभार मानले.