Press "Enter" to skip to content

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सानपाडा येथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचा शुभारंभ संपन्न !

नवी मुंबई:- नवी मुंबईतील नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षेतेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सानपाडा विभागात एकूण 10 ठिकाणी उभारलेल्या 21 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उदघाटन सोहळा नुकताच सानपाडा से-8, पोलीस चौकी येथे संपन्न झाला. यावेळी सानपाडा पोलीस उपनिरीक्षक जयदेव राठोड, भाजपा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, समाजसेवक पांडुरंग आमले, श्वेता मढवी, मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश राय, निलेश वर्पे, शशी नायर, रमेश शेट्ये, श्रीपाद पत्की, नीता आंग्रे तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते. सानपाडा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेकरिता आमदार निधीमधून रु. 25 लाख निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच सदर कॅमेऱ्याची यंत्रणा सानपाडा पोलीस चौकीच्या निगराणीखाली असणार असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, माझ्या आमदार निधीतून संपूर्ण बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक विभागात शेकडो सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात येणार असून आज सानपाडा विभागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी वाशी विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. तसेच लवकरच नेरूळ, सीवूड्स, सीबीडी-बेलापूर येथेही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, तलाव, बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर, सोसायटीच्या चौकात, शासकीय कार्यालये, हॉटेल परिसर, मंडई, बाजार, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणी हे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच दरोडा, चैन चोरी, महिला वर्गाला, मुली व जेष्ठ नागरिकांना या वाढत्या गुन्हेगारीचा होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षेतेसाठी हे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले आहेत. सदरच्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची जोडणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय करणार असल्याने जलद गतीने नवी मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील संवेदनशील ठिकाणावर या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास सहाय्य होणार आहे. तसेच नवी मुंबईही सुरक्षित राहण्यास मोलाचे ठरणार असून या व्यतिरिक्त बेलापूर मतदारसंघात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची जेथे आवश्यकता असेल अशी ठिकाणे नागरिकांनी सूचित करावी, असे आवाहनही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांजकडे कोणतेही काम घेऊन गेल्यास त्या आनंदाने ते काम स्वीकारून लवकरात लवकर मार्गी लावतात. त्यांच्याकडे आजपर्यंत घेऊन गेलेले प्रत्येक काम त्यांनी सार्थक केले असल्याचे सांगत आम्हाला मंदाताई म्हात्रे यांच्यासारख्या आमदार लाभल्या, हे आमच्या नवी मुंबईकरांचे भाग्य असल्याचे मत भाजपा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी व्यक्त केले.