पनवेल : पनवेल महानगरपालिका विकासकामांतर्गत मुर्बी गावाचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे महानगरपालिकेने मंजूर केले होते. परंतु गेल्या १ ते दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले नाही. आता कोरोनाचे संकट कमी झाले असून किमान आतातरी स्मार्ट सिटी अंतर्गत मुर्बी गावातील विकासकामे लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रभाग समिती माजी सभापती तथा नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना लेखी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक प्रविण पाटील, श्रीकांत पाटील, जगदिश करावकर, काशिनाथ घरत आदी उपस्थित होते.