पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण होत असून या पाच वर्षात पनवेल महापालिका क्षेत्राच्या नागरी सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच अनेक योजना कार्यान्वित झाल्या आहेत. एका लहान शहरापासून महानगर होण्याचा प्रवास सुरू झाला असून आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबत शहराच्या सुशोभीकरण आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. विशेष करून गेल्या दिड वर्षांपासून सुरू असलेल्या कोविडविरोधी लढाईत महापालिकेने संवेदनशिलतेने आणि तत्परतेने निर्णय घेऊन योजना राबविल्याने कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
मुंबईचे महाद्वार असलेल्या पनवेल क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेषतः शहराच्या रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधांसोबतच छ.शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,वडाळा तलाव अशा विविध स्थळांच्या सुशोभीकरणावर विशेष भर दिला आहे. २४ कोटी रूपये खर्चून अमृत कार्यक्रमांतर्गत वाढीव पनवेल पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून एक कोटी आठ लाख खर्चून मौजे कोपरा खारघर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. महापालिका क्षेत्रातील गावात १३.८० लाख रूपये खर्चून आरओ प्लॉंट बसविले असून १९.७१ लाख खर्चून कुपनलिकांवर नॉन इलेक्ट्रीक वॉटर डिसइन्फेक्शन युनिट बसविले आहेत.
वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यावर महापालिकेचा भर असून सद्याच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिक नऊची वाढ प्रस्तावित आहे. त्यासोबतच १०० खाटांचे माता बाल आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून 635 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. लसीकरण हा कोविडवरचा महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याने 33 लसीकरण केंद्रावरती कोविड लसीकरण सुरू करण्यात आले असून आजवर 7 लाख29 हजार 133 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घनकचरा,रस्ते,शौचालय साफसफाई, मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई, सार्वजनिक सेप्टीक टाकी स्वच्छ करणे, अशी दैनंदिन कामे सुरू असतात.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत 12 हजार 841 घरांचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असून त्या दृष्टीने महापालिकेने आपल्या प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया सुरू केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी सुधारित व एकत्रित विकास योजना बनविण्याचे काम सुरू आहे. पनवेल शहर हे मुंबईस जाण्याचे प्रवेशद्वार असल्याने व प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भविष्यात वाढणारी वाहतूक व लोकसंख्येचा विचार करून 11 गावांमध्ये 24.00 मी. ते 35.00 मी. रूंदीचे रस्ते प्रस्तावित केले असून, मंजूर विकास योजनेतील रस्त्यांच्या विकासा करीता भूसंपादनाचे काम सुरू आहे. तसेच पनवेल शहर येथील 6 रस्ते 9.15 मी. ते 15.00 मी. रस्ता रूंद करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे शासकीय जमिनी हस्तांतरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.






