Press "Enter" to skip to content

नवी मुंबई मेट्रोला दूरसंचार विभागाकडून डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र प्रदान ! प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने गाठला महत्त्वाचा टप्पा !

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोकरिता केंद्रीय दूरसंचार विभाग यांच्याकडून नुकतेच विद्युतीकरणविषयक डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. यामुळे सदर मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

“डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि सेफ्टी केस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पामधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. यानंतर आयएसए प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येईल. त्यापुढील टप्प्यात आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वाणिज्यिक परिचालन चाचणी घेण्यात येईल.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सिडको महामंडळाकडून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 मार्ग साकारण्यात येत असून बेलापूर ते पेंधर या 11 कि.मी. च्या मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोची आरडीएसओ (रिसर्च डिझाईन ॲन्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ऑसिलेशन चाचणी घेण्यात आली आहे. सदर मेट्रो मार्गाचे विद्युतीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय दूरसंचार विभागाकडून या मार्गावरील स्थानक क्र. 1 ते 10 या भागाची पाहणी करण्यात येऊन डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर पुढील टप्प्यात मेट्रो मार्ग क्र. 1 वर आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या देखरेखीखाली वाणिज्यिक परिचालन चाचणी घेण्यात येईल.