Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका साकारणार स्वतंत्र भव्य मुख्यालय ! महासभेची मान्यता, लवकरच काम सुरू होणार !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेत पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग ‘क’ मधील भूखंड क्र 04 सेक्टर 16 नवीन पनवेल या भूखंडावर पनवेल महानगरपालिका मुख्यालय बांधणे हा विषय महासभेने एकमताने मंजूर केला.

24सप्टेंबर रोजी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयी –सुविधा पुरविण्याकरिता अद्यावत,प्रशस्त कार्यालयाची आश्यकता असल्याने महापालिकेच्या मुख्यालयाचा ठराव आज महासभेत मांडण्यात आला. हा विषय सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजूर करून आयुक्तांचे अभिनंदन केले.

प्रस्तावित मुख्यालयाची इमारत ही सहा मजली असून तळघर वाहनचालक, फॅन रूम, सर्व्हिस रूम, एसटीपी रूम, व पार्किंग असणार आहे. तळमजला नागरी सुविधा केंद्र, भांडार विभाग, पत्रकार कक्ष, उपहारगृह, दिव्यांग कक्ष, वाचनालय असणार आहे. पहिल्या मजल्यावरती संगणक कक्ष, बँक एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावरती बहुद्येशीय हॉल, अग्निशमन विभाग, पर्यावरण विभाग, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, कर विभाग, लेखा विभाग, परिक्षक विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग असणार आहे.

तिसऱ्या मजल्यावरती पाणी पुरवठा, विद्युत विभाग, मलनिस्सारण विभाग, वैद्यकिय आरोग्य विभाग, ग्रंथपाल, सुरक्षा विभाग, माहिती व तंत्रज्ञान , मालमत्ता विभाग, क्रिडा विभाग, विधी विभाग असणार आहे. चौथ्या मजल्यावरती नगर रचना विभाग, शहर अभियंता विभाग, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) विभाग,अभिलेख कक्ष, भविष्यातील विस्तार करीता मोकळी जागा असणार आहे.

पाचव्या मजल्यावरती महापौर दालन, उपमहापौर दालन,स्थायी समिती दालन, सभागृह नेते दालन, विरोधी पक्ष नेता दालन,कॉन्फरन्स हॉल, समिती बैठक कक्ष,तसेच आयुक्त दालन, अतिरिक्त आयुक्त दालन असणार आहे. सहाव्या मजल्यावरती महासभा सभागृह सचिव कार्यालय,महिला नगरसेविका कक्ष,महिला –बालकल्याण समिती दालन, गटनेते दालन असणार आहे.
सहाव्या वरच्या मजल्यावरती प्रेस व्हिवींग गॅलरी, व्हिआयपी गॅलरी, ऑडीओ विज्युल रूम, गटनेते दालन,असणार आहे. टेरेसवरती कला दालन असणार आहे.

यावेळी मुख्यालयाच्या इमारतीचे प्रेझेंटेशन सर्वांना दाखविण्यात आले. मुख्यालयाची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी नगरसेवकांना दिली. यावरती नगरसेवकांच्या सूचना विचारून त्यांची नोंद घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर कळंबोली, नवीन पनवेल येथील उद्याने , खेळांची मैदाने विकसित करण्याच्या विषयाला महासभेने मान्यता दिली.

महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंड क्र.247 मधील कॉमप्लेक्स इमारतीवर दूसऱ्या मजल्याचे महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाज करण्यासाठी बांधकाम करणे आणि अस्तित्वात तळमजला, पहिला मजला इमारतीची दुरूस्ती करणे या विषयास स्थगिती देण्यात आली.