पनवेल : पायाभूत सेवा-सुविधा, सिडकोकडील राखीव भूखंड पनवेल महापालिकेला हस्तांतरणाबाबत आज पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि सिडकोचे जॉईंन्ट एम डी एस. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिडको भवन येथे बैठक झाली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील बहुतांश भाग हा सिडको प्राधिकरणाचा असल्याने त्यांच्याकडील सेवा-सुविधा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सद्य स्थितीत सुरू आहे. यामध्ये रस्ते, फूटपाथ, मलनिस्सारण वाहिनी, एसटीपी प्लॅन्ट, इलेक्ट्रीकल व एच टी कनेक्शन्स,पथदिवे, उद्याने, खेळाची मैदाने, ट्री बेल्ट, होल्डिंग पॉन्ड्स, स्मशानभूमी, रोज बाजार ,अग्निशमन या सेवा लवकरात लवकर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याअनुषंगाने येत्या 27 तारखेपासून सेवा –सुविधा पहाणी कार्यक्रम हाती घ्यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या सेवा-सुविधांचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महापालिका त्यांची देखभाल दुरूस्ती करणार आहे. बैठकीवेळी उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप तसेच सिडको अधिकारी उपस्थित होते.
चौकट
याचबरोबर कळंबोली येथील सीसीआयच्या गोदामामध्ये सुरू असलेल्या कोविड जंबो सेंटरच्या हस्तांतरणाबाबतची बैठक झाली. जे काही अपुरे काम राहिले आहे ते लवकर पूर्ण करून येत्या काही दिवसात हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन सिडकोच्यावतीने देण्यात आले. या बैठकिस ,उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, डॉ.रेहाना मुजावर, सिडकोचे जॉईन्ट एम.डी कैलास शिंदे ,सुप्रिटेडिंग इंजिनीअर रमेश गिरी इतर अधिकारी उपस्थित होते.






