नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता आवश्यकतेनुसार सिडकोच्या एम्पॅनल्ड बॅंकांकडून कर्ज मिळू शकणार आहे. हा निर्णय गृहनिर्माण योजनेकरिता अर्ज करणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
“अर्जदारांना अनामत रक्कमेची जमवाजमव सुलभतेने करता यावी यासाठी सिडकोने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. अर्जदारांनी आपल्या आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या घराचे स्वप्न साकार करावे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडकोकडून 15 ऑगस्ट 2021 रोजी कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये एकूण 4,488 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण 4,488 घरांपैकी 1088 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित 3400 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकारिता रु. 2 लाख आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता रु. 2.5 लाख अनामत रक्कम लागू आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी व अनामत रक्कम भरण्याकरिता 09 सप्टेंबर 2021 ही अंतिम तारीख असताना अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून यापूर्वीच 07 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर मुदतवाढीनंतर अनेक अर्जदारांच्या विनंतीनुसार सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बॅंकांशी संपर्क साधून अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याकरिता आर्थिक सहाय्य करण्याबाबत व्यवस्था करण्यास सुचवले. यानंतर एम्पॅनल्ड बॅंकांनी संबंधित अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता कर्ज देण्यास अनुकूलता दर्शविली. यानुसार एम्पॅनल्ड बॅंकांची यादी योजनेच्या https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तथापि, अर्जदार व बॅंका यांमध्ये या संदर्भात करण्यात येणाऱ्या व्यवहारात सिडकोची कोणतीही भूमिका नसून अर्जदारांनी आपल्या जबाबादारीवर सदर बॅंकांशी व्यवहार करावा, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे.





