Press "Enter" to skip to content

खारघरचा राजा ! सार्वजनिक गणेशोत्सवाचे २१ वे वर्ष ! जनसेवेची अखंड परंपरा ! संस्थापक-अध्यक्ष : विजय पाटील !

पनवेल : जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन सामाजिक चळवळीतील भूमिपूत्र नेते विजय पाटील यांनी १९९९ साली खारघर येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत खारघरचा राजा नावाने मागील २१ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष : विजय पाटील यांच्या पुढाकाराने आणि खारघरचा राजाच्या माध्यमातून जनसेवेची अखंड परंपरा सुरु आहे.

सिडकोच्या माध्यमातून खारघर हे नवीन शहर वसविले जात असताना शहरामध्ये विविध प्रांतातून, शहरातून विविध जाती-धर्माची लोकं येथे वास्तव्य करायला येत होती. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी, खारघर शहरात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी विजय पाटील यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर १२ रहिवाशी संघाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तदनंतर, पुढील २ ते ३ वर्षात श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यात आले. तेव्हापासून खारघरचा राजा या नावाने येथील गणरायाला ओळखले जाते.

खारघरचा राजाने पर्यावरणाची जबाबदारी आणि सामाजिक दायित्व सदैव जपले आहे. मागील २१ वर्षांपासून इको फ्रेडली गणेशोत्सवाची परंपरा खारघरच्या राजाने जपली आहे. १३ फूट उंचीची भव्य-दिव्य गणेशमूर्ती सर्वच भाविकांचे आकर्षण ठरली आहे. १३ फूट उंच असलेल्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. मंडळाच्या माध्यमातून प्रतीकात्मक विसर्जन करून प्रत्येकवर्षी १३ फूट असलेल्या इको फ्रेडली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. २००६ साली खारघरचा राजा मंदिराची स्थापना करून सामाजिक उपक्रमांना अधिक गती दिली आहे. खारघरचा राजा हे मंदिर राजस्थान येथील पुरातन मंदिराची प्रतिकृती आहे.

संस्थापक-अध्यक्ष विजय पाटील यांच्या पुढाकाराने श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत खारघरचा राजाच्या माध्यमातून २१ वर्षांपासून जनसेवेची अखंडपणे परंपरा सुरु असल्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी , नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि कर्नाळा ट्रस्टच्या वतीने सर्वोच्च पदाने सन्मानित करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे जागतिक संकट सुरु आहे. मात्र, या कठीण काळात देखील खारघरचा राजाची जनसेवा अखंडपणे सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन मागील दोन वर्षांपासून सेक्टर १२ येथील खारघरचा राजा मंदिरात छोटेखानी गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सव छोटेखानी असला तरी उत्सवाद्वारे जनसेवेचे व्यापकता मोठी आहे.