नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर घेण्यात येत असलेल्या मेट्रोच्या ऑसिलेशन आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचण्यांची 02 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी पाहणी केली व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. सदर मार्गावर रिसर्च डिझाईन ॲन्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्याकडून 28 ऑगस्ट 2021 पासून मेट्रोची ऑसिलेशन चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली असून 14 सप्टेंबर 2021 पर्यंत ही चाचणी घेण्यात येणार आहे.
“मेट्रोची ऑसिलेशन चाचणी हा नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वीचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे लवकरच या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य होणार असून, मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, सुखकारक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
या प्रसंगी सिडकोतील श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. के. एम. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), सिडको, संजय नाडगौडा, अतिरिक्त मुख्य अभियंता (1 आणि मेट्रो), सिडको, श्री. नहाणे, कार्यकारी अभियंता, सिडको, श्री. कौशल किशोर, सल्लागार, सिडको, श्री. सुनिल गुज्जेलवार, सल्लागार, सिडको, श्री. नामदेव रबाडे, कार्यकारी संचालक, महा मेट्रो, श्री. अरुण सक्सेना, मुख्य प्रकल्प अभियंता (स्थापत्य), महा मेट्रो, श्री. तिवारी यांच्या नेतृत्वाखालील आरडीएसओची टीम यांसह कंत्राटदार जे. कुमार आणि सीआरसीसी हे उपस्थित होते.
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. या मार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता सिडकोकडून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून मुख्य व्हायडक्ट, आगार प्रवेश व्हायडक्ट, आगार व कार्यशाळा उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. तर स्थानकांची उभारणी, लिफ्ट, उद्ववाहन, फर्निचर आणि प्रणाली ही कामे प्रगतीपथावर आहेत.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आरडीएसओ यांच्यावर देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. यानुसार आरडीएसओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ऑसिलेशन चाचणी पार पडल्यानंतर लवकरच मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.





