पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध नागरी विकासकामे करण्यासाठी पालिका प्रशासनाने करोडो रुपयांचे ठेके दिले, मात्र अनेक ठेकेदारांनी कामांमध्ये बेजबाबदारपणा आणि दिरंगाई केल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाने सदर ठेकेदारांवर कारवाईचे निशाण साधले आहे. अशा बेजबाबदार ठेकेदारांची चौकशी करण्याचे निर्देश मीपण आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. पनवेल मनपा क्षेत्रात काम करणाऱ्या ८ ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, खारघर येथील तलावाच्या सुशोभीकरणात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा ठपका ठेवत सदर काम पनवेल पालिकेने रोखले आहे. सदर प्रकरणाची साखवळ चौकशी करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. पनवेल महानगरपालिकेने खारघर सेक्टर १५ येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा ठेका मे अभय जाधव नामक ठेकेदाराला दिला, मात्र सदर ठेकेदार कामासाठी लागणारी वीज चोरून वापरत होता. खारघर विद्युत विभागाने सदर ठेकेदारावर धडक कारवाई केल्यानंतर खारघरवासीयांनी ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. त्यामुळे पनवेल मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन सदर ठेकेदारावर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर सिडको आणि पालिका वादात विकास अडकला होता. आता पालिकेने विकासकामांना झपाट्याने सुरुवात केली असता ठेकेदार दर्जेदार आणि वेळेत काम करण्या ऐवजी कामात दिरंगाई लावीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी अशा बेजबाबर ठेकेदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.





