पनवेल : पनवेल महानगरपालिकेने खारघर सेक्टर १५ येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा ठेका मे अभय जाधव नामक ठेकेदाराला दिला, मात्र सदर ठेकेदार कामासाठी लागणारी वीज चोरून वापरत होता. खारघर विद्युत विभागाने सदर ठेकेदारावर धडक कारवाई केल्यानंतर खारघरवासीयांनी ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. त्यामुळे पनवेल मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन सदर ठेकेदारावर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर विभागात मोठे सार्वजनिक उपक्रमाचे काम हाती घेण्यात आले आहे. खारघर सेक्टर १५ मधील घरकूल व स्पॅगेटी सोसायटीच्या जवळ सदर तलाव आहे. या तलावात संपूर्ण खरघरमधील बहुसंख्य गौरी गणपती आणि देवीचे विसर्जन होते. सदर तलावाच्या सुशोभिकरणासाठी पनवेल महानगरपालिकेने मे जाधव नामक ठेकेदाराला नेमले आहे. या कामासाठी पनवेल मनपा सुमारे ३ कोटीहून अधिक रक्कम खर्च करणार आहे. मात्र, ठेकेदाराने कामात नैतिकता न पाळता मोठा फायदा कमविण्यासाठी कामात चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे वीज चोरीच्या प्रकरणातून उघड झाले आहे. त्यामुळे सुशोभीकरणाच्या कामात देखील मोठा घोटाळा होण्याची शक्यता खारघवासीयांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या कामाच्या दर्जाचे ऑडिट करावे, अशी मागणी खारघरवासीयांनी केली आहे. सदर ठेकेदार नैतिक मूल्ये जपत नसल्याने खारघर तलावाचे काम दर्जेदार होणार नाही,अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी सदर प्रश्नी पनवेल मनपा प्रशासनाकडे आवाज उठवून विद्यमान ठेकेदाराला बडतर्फ करून नवीन ठेकेदार नेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी देखील नागरिक करीत आहेत. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.






