पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात येत असलेल्या खारघर सेक्टर १५ येथील तलावाच्या कामासाठी चोरीची वीज वापरली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मधुकर मयेकर यांनी खारघर विद्युत विभाग आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
खारघर सेक्टर १५ मधील घरकूल व स्पॅगेटी सोसायटीच्या जवळ सदर तलाव आहे. सदर तलाव कोपरा गाव तलाव म्हणून ओळखला जातो. सदर तलावाच्या सुशोभिकरणासाठी पनवेल महानगरपालिकेने मे जाधव नामक ठेकेदाराला नेमले आहे. या कामासाठी पनवेल मनपा सुमारे ३ कोटीहून अधिक रक्कम खर्च करणार आहे. मात्र, ठेकेदार कामासाठी चोरीची वीज वापरत असल्याचे आज खारघर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष रंगेहाथ पकडल्याचे मधुकर मयेकर यांनी पत्रकारांना सांगितले. या अगोदर देखील येथील कामासाठी केलेली वीज चोरी पकडून दिल्याचा खुलासा श्री. मयेकर यांनी केली आहे.
दरम्यान, खारघर विद्युत विभाग आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन याबाबत काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






